जि.प. प्रा. शाळा गोंडजेवली तांडा ता. किनवट जि. नांदेड "गावपणाचं शाळापण होणं हीच खरी शैक्षणिक क्रांती!"
#प्रवेशोत्सव २०२५*
"गावपणाचं शाळापण होणं हीच खरी शैक्षणिक क्रांती!"
गावात शिक्षणाचा गजर झाला की, गावाचा आत्मा उजळतो, संस्कृती फुलते आणि भविष्य घडते. जि.प. प्रा. शाळा गोंडजेवली तांडा ता. किनवट जि. नांदेड येथील प्रवेशोत्सवाने याचे जिवंत उदाहरण घालून दिले आहे. पहिल्याच दिवशी शाळेमध्ये जो उत्सव रंगला, तो केवळ कार्यक्रम नव्हता – तो गावाच्या मनाचा, भावनांचा आणि शिक्षणावरील श्रद्धेचा उत्स्फोट होता.
परंपरागत हलगीच्या गजरात, बैलगाड्यांवर आणि घोड्यावर बसवून गावात मिरवणूक काढत चिमुकल्यांचं ज्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं, ते पाहून डोळ्यांतून नकळत अश्रू वाहू लागले. हा क्षण केवळ पाहण्याचा नव्हता, तो अनुभवण्याचा होता – तो एक इतिहास घडवणारा क्षण होता.
गावकरी स्वतःहून पुढे आले, कोणाच्या सांगण्याची वाट न पाहता शिक्षण मिरवणुकीचा भाग बनले. कोणाची जबाबदारी नाही, पण प्रेमाने घेतलेली भूमिका – हीच खरी लोकशाही, हीच खरी ग्रामशिक्षणाची ताकद!
या कार्यक्रमाच्या यशामागे ज्या हातांची उष्णता आहे, ते आहेत शाळेचे शिक्षक दिलीप वाघमारे सर आणि मुख्याध्यापक महोदय. केवळ शिकवणारे नव्हे, तर गावाला एकत्र आणणारे, संस्कारांची मशाल घेऊन चालणारे हे उपक्रमशील शिक्षक. त्यांनी केवळ इयत्ता पहिलीच्या नवागतांचं स्वागत केलं नाही, तर गावाच्या शिक्षणावरचा विश्वास द्विगुणित केला.
शाळेच्या अंगणात आज फुललेली फुलं ही केवळ चिमुकल्या विद्यार्थ्यांची नव्हती, ती नवचैतन्याची, नवसंस्कारांची, नवभारताच्या स्वप्नांची होती. गावातील माता-पिता, आजी-आजोबा, लहानथोर सर्वजण या प्रवेशोत्सवात सहभागी होऊन एक सुंदर चित्र रंगवून गेले.
ही शाळा आता केवळ शिक्षण देत नाही, ही शाळा गावाचं हृदय बनली आहे.
"चिमुकल्या हातांनी घेतलेली शाळेची पाटी, गावाच्या प्रगतीचा पहिला धडा बनत आहे!"
शब्दांकन :
धनलाल मांगीलाल राठोड (कंचलीकर)
संचालक :- जनसेवा कंप्यूटर, शिवणी
Mo. 8368341988,7057926410
Comments