शाळा म्हणजेच भविष्याची मंदिरं – जपा, वाढवा, घडवा!


शाळा म्हणजेच भविष्याची मंदिरं – जपा, वाढवा, घडवा!

कथा, कीर्तनं, मंदिरे, यात्रा – ही आपल्या भारतीय संस्कृतीची मुळे आहेत. श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा हा अनमोल वारसा आपल्याला भावनिक आणि सामाजिकदृष्ट्या जोडून ठेवतो. गावागावांमध्ये करोडोंची कथा-कीर्तनं होतात, सोन्याचे कळस चढवले जातात, हजारो भाविकांची गर्दी भरते. यात गैर काहीच नाही. देवावरील श्रद्धा ही प्रत्येकाच्या मनात खोलवर रुजलेली आहे.


पण...

या सर्व गोष्टींच्या मध्यवर्ती जर काही असावे, तर ती मानवता आणि शिक्षणाची जाणीव असावी.


आपण मंदिर बांधतो, सोन्याचे कळस चढवतो, दानपेटीत हजारो-लाखोंचे दान टाकतो. पण त्याच गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला पत्र्याचे छप्पर, फुटकी बेंचेस, भिंतीला रंग नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, शौचालय मोडकळीस आलेले – ही दुर्दैवाची गोष्ट वाटत नाही का?


शाळा म्हणजे केवळ शिक्षण मिळवण्याची जागा नाही – ती एक संस्कारांची कार्यशाळा आहे. इथेच एक शेतकरी, एक डॉक्टर, एक शिक्षक, एक वैज्ञानिक, एक सैनिक घडतो. ही ती जागा आहे जिथे मुलांना स्वतःची ओळख सापडते, स्वप्नांना दिशा मिळते, आणि जीवनाला अर्थ मिळतो.


🔰शाळा हेच खरे मंदिर आहे – कारण इथे ज्ञानाचे दान होते.

🔰शाळा हेच खरे कीर्तन आहे – कारण इथे चार शब्द शिकले की आयुष्यभर बदल घडतो.

🔰शाळा हाच खरा धर्म आहे – कारण इथे माणूस घडतो!


आज जर आपण आपल्या श्रद्धेचा आणि दानशक्तीचा काही भाग गावातील शाळेकडे वळवला, तर समाजात खरा बदल घडेल. मंदिरात चार दिवे लावले तर मिणमिणते प्रकाश येईल, पण शाळेत एक दिवा पेटवला तर संपूर्ण पिढी उजळून निघेल.


म्हणूनच...

कथा, कीर्तनं, मंदीरे बांधा; त्यावर सोन्याचे कळस चढवा, ही तुमची श्रद्धा जपा – पण जिथे तुमची मुले शिकतात त्या शाळेसाठी किमान दोन दगड आणि चार विटा तरी द्या.

कारण शिक्षणाशिवाय समाजाचा उद्धार नाही, आणि शाळेशिवाय शिक्षणाचा पाया नाही.


शाळेकडे दुर्लक्ष म्हणजे आपल्या पायावर आपल्याच हाताने कुऱ्हाड मारणं!


देव आणि धर्मात श्रद्धा असू द्या, पण त्याच बरोबर शिक्षणातही आस्था ठेवा.

कारण "शाळा" हीच खरी ज्ञानमंदिर आहे!


लेखक: धनलाल मांगीलाल राठोड (कंचलीकर)

संचालक: जनसेवा कं प्यूटर, शिवणी

Mo. 8668341988,7057926410

(हा लेख शाळा विकास आणि ग्रामीण शिक्षणाबद्दल जनजागृतीसाठी लिहिण्यात आलेला आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा.

Comments